काँग्रेस पक्ष ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ विरोधात
चिपळूण:
काँग्रेसने लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यासंदर्भातील प्रश्न काँग्रेसचे आमदार अधिवेशनात मांडतील. लोटे ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनास आमचा पाठिंबा आहे. कुठल्याही परिस्थितीत हा उद्योग सुरु राहू नये ही काँग्रेसची मुख्य मागणी आहे. इटलीमध्ये बंद होणारी कंपनी कोकणात येते असेल तर हा कोकणात सोबत केलेला धोका आहे. याविषयी कोकणातील आमदार, मंत्री गप्प का असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत विचारला आहे.
युती, आघाडी आणि तडजोडीचे सुरु असलेल्या राजकारणामुळे याचा काँग्रेसला फटका बसत आहे. अशातूनही मार्ग काढून काँग्रेसला कोकणात पूर्वीसारखेच गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे ते म्हणाले.
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकानंतर काँग्रेसच्या चिन्हावर लढलेल्या उमेदवारांना अधिक सक्षम करण्यासाठी येथे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याची सांगता रविवारी झाली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, तळागाळापर्यंत काँग्रेस वाढविण्यासाठी संघटन बांधणीवर विशेष भर दिला जात असून त्यातून निश्चिनणे काँग्रेस पक्ष अधिकाधिक बळकट होईल. गेली २०-३० वर्षामध्ये राज्यात युती, आघाडी आणि तडजोडीचे राजकारण सुरु आहे. याचा काँग्रेसला फटका बसत आहे. अशातूनही मार्ग काढून भविष्यात काँग्रेसला बळकटी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यामुळेच काँग्रेसला राज्यासह कोकणात पूर्वीसारखेच गतवैभव प्राप्त होईल. येणाऱ्या काळात कॉंग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी राहणार नाही.
शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही काँग्रेसची भुमिका असून त्यासाठी मोर्चे, आंदोलनाचा मार्ग स्विकारला जात आहे. कोकणातील समस्यासाठी निश्चितपणे आगामी काळात काँग्रेस आक्रमक स्वरुपाची भूमिका घेईल.
जिल्ह्यात काँग्रेस तळागळापर्यंत नेऊ यासाठी पहिल्यांदा संघटन बांधणी केली जाणार आहे. ग्रामीण, शहरी जनतेला भेडसावणारे मूलभूत प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही कायमच प्रयत्नशील असू, इतकेच नव्हे तर विकासाचे संकल्प देखील आम्ही तळागळापर्यंत नेऊ असे मतही जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी व्यक्त केले आहे. यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, महाराष्ट्र प्रदेशचे नेते आमदार भाई जगताप आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.