फणसोप येथील वृद्धाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
रत्नागिरी:
तालुक्यातील फणसोप (मराठवाडी) येथील एका ६२ वर्षीय वृद्धाचा अचानक चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सुनिल महादेव पातेरे असे मृत व्यक्तीचे नाव असून, शुक्रवारी दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत सुनिल पातेरे यांना गेल्या काही काळापासून मधुमेह (शुगर) आणि रक्तदाबाचा (बीपी) त्रास होता, ज्यावर त्यांचे उपचार सुरू होते. शुक्रवारी, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास ते फणसोप येथील आपल्या घरी असताना लघवीला जाण्यासाठी उठले.
यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्याने ते जमिनीवर बेशुद्ध पडले. त्यांचे पुतणे विकास विनायक पातेरे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), रत्नागिरी येथे हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर सायंकाळी ४:१५ वाजताच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची माहिती विकास पातेरे यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.