वाहतुकीला अडथळा; ‘टाटा सुमो’ वर कारवाई
७३ वर्षीय चालकावर गुन्हा दाखल
राजापूर:
राजापूर तालुक्यातील नाटे ते धारतळे मार्गावर वाहतुकीला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याप्रकरणी नाटे सागरी पोलिसांनी एका ७३ वर्षीय चालकावर गुन्हा दाखल केला आहे. वाघेडी बसस्टॉप आणि श्री अन्नपूर्णा हॉटेलच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली.
शनिवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २:१० च्या सुमारास नाटे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सिद्रम निगाप्पा कांबळे हे गस्तीवर असताना त्यांना वाघेडी बसस्टॉपजवळ एक टाटा सुमो गाडी (क्रमांक MH 08 DN 8332) संशयास्पदरीत्या उभी असलेली आढळली. तपासणी केली असता, चालक सुलेमान आदम हातवडकर (वय ७३, रा. साखरी नाटे) यांनी आपली गाडी रस्त्याच्या अशा भागात उभी केली होती, ज्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना आणि इतर वाहनांना गंभीर धोका निर्माण झाला होता. या बेजबाबदार पार्किंगमुळे अपघाताची शक्यता आणि वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
रस्त्यावरील सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने दखल घेतली. दुपारी ३ वाजता नाटे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली. आरोपी सुलेमान हातवडकर यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.