पोलीस बांधव होणार शिमग्याचे सोबती
सामाजिक सद्भावनेसाठी पोलीस अधीक्षकांचे खास पाऊल
रत्नागिरी
सध्या कोकणात शिमगा उत्सव सुरू असून, त्यानिमित्त सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे; मात्र जिल्ह्यातील काही गावांमध्ये सिम्बोत्सवावरून मानपानाचे वाद आहेत. त्यामुळे हा उत्सव साजरा करण्यात अडचणी निर्माण होत असून आनंदावर विरजण पडत आहे. त्यामुळे उत्सव साजरा करण्यास अडचण असले अशा ठिकाणी जिल्हा पोलीस दलातील आपल्या पोलीस बांधवांना फोन करा. ते आपल्यासोबत सहभागी होतील आणि आपली अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतील, असे आवाहन करतानाच पोलीस बांधवांना आपल्या शिमगा उत्सवात सहभागी करून घ्या. एक सामाजिक बांधिलकी म्हणून, एक सामाजिक सद्भावना म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस सदैव आपल्या पाठीशी असेल, असे आश्वासन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिले आहे.
आज सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. बगाटे म्हणाले, “शिमोत्सवाच्या निमित्ताने पूर्ण जिल्ह्यात जिल्हा पोलीस दलामार्फत बैठका घेण्यात आल्या आहेत; मात्र तरीही रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याचशा गावांमध्ये मानापनाचा वाद असल्याच्या खूप साऱ्या तक्रारी येत आहेत. ज्या ज्या गावांमध्ये मानापनाच्या वादावरून शिमगा साजरा करण्यात अडचण निर्माण होतात आणि गावातील आनंदाच्या, उत्साहाच्या वातावरणावर विरजण पडत आहे, अशा गावातल्या सर्व नागरिकांनी सर्वांनी येणारा शिमगा उत्सव शांततेत साजरा करावा.”
“शिमगा उत्सव शांततेत साजरा करण्यात काही अडचणी असतील, तर तत्काळ पोलीस बांधवांना फोन करा. शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा पोलीस दलातील आपले बांधव आपल्या सोबत सहभागी होतील आणि आपली अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतील. आपल्या शिमगा उत्सवात सहभागी करून घ्या एक सामाजिक बांधिलकी म्हणून, एक सामाजिक सद्भावना म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस सदैव आपल्या पाठीशी असेल आणि आपला शिमगा उत्सव आपण खूप आनंदात आणि चांगल्यारितीने साजरा करा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे.