मिरजोळी येथे गोवा बनावटीच्या दारूवर छापा
५४ वर्षीय इसमावर गुन्हा दाखल
चिपळूण:
चिपळूण तालुक्यातील मिरजोळी साखरवाडी परिसरात बेकायदेशीरपणे गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका इसमावर चिपळूण पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मिरजोळी साखरवाडी येथील खेराडे कॉम्प्लेक्स आणि वाशिष्टी सर्व्हिसिंग सेंटर यांच्यामधील गल्लीत एक इसम बेकायदा दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी एकूण १,९१५ रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. यामध्ये गोल्ड अँड ब्लॅक रमच्या ३५ प्लास्टिक बाटल्या, मॅक्डॉवेल्स नं. १ च्या ४ बाटल्या, गोल्ड अँड ब्लॅक रमच्या ३ प्लास्टिक बाटल्या या मुद्देमालाचा समावेश आहे:
याप्रकरणी आरोपी अनंत तुकाराम पवार (वय ५४ वर्षे, रा. मिरजोळी, पवारवाडी, ता. चिपळूण) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना ही दारू जवळ बाळगली होती. गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मारोती तुकाराम वागदकर (सध्या संलग्न उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, चिपळूण) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चिपळूण पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ५६/२०२६) दाखल केला आहे.