‘त्या’ लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल
एसीबीची चिपळूण येथे मोठी कारवाई
चिपळूण: विमा दाव्यासाठी आवश्यक आरटीओ तपासणी अहवाल आणि डीओआर फॉर्म देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आणि एका खासगी दुकानदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार ॲडव्होकेट ऋषिकेश बाळाराम चिपळूणकर यांच्या पक्षकाराचा विमा दावा दाखल करायचा होता. त्यासाठी आवश्यक असलेले शासकीय कागदपत्रे (आरटीओ तपासणी अहवाल आणि डीओआर फॉर्म) देण्यासाठी सावर्डे पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मनिष रघुनाथ कांबळे (वय ५७) यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ च्या दरम्यान मनिष कांबळे यांनी मोबाईलवरून ही लाचेची मागणी केली आणि ही रक्कम चिपळूण येथील खासगी दुकानदार अभिजीत प्रकाश शिर्के (वय ४२, रा. पागमळा) याच्याकडे देण्यास सांगितले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची शहानिशा करून चिपळूण पोलीस स्टेशनजवळ असलेल्या ‘श्री सोमेश्वर कॉर्नर जनरल स्टोअर्स’ या दुकानात सापळा रचला. रात्री ८ च्या दरम्यान, दुकानदार अभिजीत शिर्के याने पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्या सांगण्यावरून १५ हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली. रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले.
याप्रकरणी रत्नागिरी एसीबीचे पोलीस निरीक्षक सहास हरिदास रोकडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संंशयित् मनिष रघुनाथ कांबळे (वय ५७, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सावर्डे पोलीस ठाणे) आणि अभिजीत प्रकाश शिर्के (वय ४२, दुकानदार, रा. पागमळा, चिपळूण)यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) च्या कलम ७ आणि ७(अ) नुसार चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.