मांडकी पालवण येथे १३ पासून साहित्य संमेलनाचा जागर
अंजलीताई चोरगे यांचे साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन
चिपळूण (प्रतिनिधी):
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण (ता. चिपळूण) यांच्या वतीने येत्या १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भव्य साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनासाठी महाराष्ट्र राज्य तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या संचालिका तथा संमेलन स्मरणिकेच्या संपादिका सौ. अंजलीताई चोरगे यांनी केले आहे.
कृषी, ग्रामीण आणि सहकार साहित्याचा संगम
हे साहित्य संमेलन केवळ साहित्यापुरते मर्यादित न राहता त्यात ग्रामीण जीवन, कृषी संस्कृती आणि सहकार क्षेत्रातील विचारांचे आदानप्रदान होणार आहे. मांडकी पालवण येथील निसर्गरम्य परिसरात होणाऱ्या या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंतांची उपस्थिती लाभणार आहे.
संमेलनाच्या पूर्वतयारीबाबत माहिती देताना सौ. अंजलीताई चोरगे म्हणाल्या की, “साहित्य हे समाजाचा आरसा असते. ग्रामीण आणि कृषी क्षेत्रातील अनुभवांना शब्दांची धार मिळावी आणि नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावे, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण, कृषी व सहकार क्षेत्रातील साहित्यप्रेमींनी या तीन दिवसीय वैचारिक मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावे.”
१३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मांडकी पालवण, ता. चिपळूण येथे आयोजित संमेलनात या निमित्ताने काढण्यात येणारी विशेष ‘स्मरणिका’, ज्यात विविध मान्यवरांचे लेख समाविष्ट असतील. चिपळूण तालुक्यात होणाऱ्या या मोठ्या साहित्य संमेलनामुळे सांस्कृतिक वातावरणात उत्साहाचे वारे वाहत असून, चोख तयारी करण्यात आली आहे.