चिपळूणमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम: ४ हजार दुबार मतदारांमुळे यंत्रणा हायअलर्टवर
चिपळूण : तालुक्यात पंचायत समितीच्या १८ आणि जिल्हा परिषदेच्या नऊ जागांसाठी शनिवारी (ता. ७) मतदान होणार आहे. तालुक्यात ४ हजार ४६ दुबार मतदार आढळले आहेत. त्यांच्याकडून बनावट मतदान होणार नाही यासाठी निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना अलर्ट राहावे लागणार आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी ३८ उमेदवार उभे आहेत. पंचायत समितीच्या १८ जागांसाठी ६१ उमेदवार उभे आहेत. एकूण ९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळत आहे. तालुक्यातील २४५ मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. येथील युनायटेड इंग्लिश केंद्रातून मतदान यंत्र केंद्रावर पाठवण्यात आले आहेत.
तालुक्यातील ३१ मतदान केंद्रांत १ हजाराहून जास्त मतदारांची संख्या आहे. पेढे येथे ११४९ मतदारांचे सर्वात मोठे केंद्र असून, गुढे येथे सर्वाधिक कमी १९२ मतदारांची संख्या असलेले केंद्र आहे. या निवडणुकीसाठी ३४० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यात ३ फिरते भरारी पथक कार्यरत राहणार आहे. पेढे फरशीतिठा, कुंभार्ली चेकपोस्ट, खेरशेत टोलनाका, मार्गताम्हाणे सुरळ फाटा, आबलोली मूर्तवडे फाटा येथे स्थिर सर्व्हेक्षण पथके तैनात केली आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण १८ नोडल अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या असून, एकूण २६११ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
चौकट
एकाच ठिकाणी मतदानासाठी लेखी पत्र
तालुक्यात आढळलेल्या दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे. त्यासाठी संबंधित दुबार मतदारांचे प्रशासनाकडून लेखी पत्र घेण्यात आले आहे. निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यापासून आतापर्यंत शांततेत प्रचार सुरू आहे; मात्र प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर ते ४८ तास उमेदवार पक्षाचे कार्यकर्ते आणि निवडणूक यंत्रणांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. तालुक्यात कुठेही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे.