महात्मा फुले आरोग्य योजनेला निधीचे ‘बळ’
रत्नागिरीतील रुग्णालयांची सात महिन्यांची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे
रत्नागिरी ः महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर केलेल्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा परतावा जुलै महिन्यापासून सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयांना मिळाला नव्हता. त्यामुळे निधीसाठी रुग्णालये प्रतीक्षेत आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्याची थकबाकी १८ कोटींची आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी १ हजार १६२ कोटी मंजूर झाले असून, त्यातून रत्नागिरी जिल्ह्याला निधी मिळेल, अशी आशा निर्माण झालेली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने या योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयांचे दावे निकाली काढण्यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीनुसार, १ हजार १६२ कोटी ८ लाख ६३ हजार ३२१ रुपये इतका निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे देण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून दरवर्षी हजारो रुग्ण या योजनेतून उपचार घेतात. या योजनेतून सरकारच्यावतीने खासगी, सार्वजनिक रुग्णालयांना उपचारांचा परतावा मिळत असतो. मागील जुलै महिन्यापासून हा परतावा मिळालेला नव्हता. जिल्ह्यासह राज्यातील सार्वजनिक रुग्णालयांनी कोट्यवधी रुपये थकल्याच्या तक्रारी वाढत होत्या. समन्वयाकडे संपर्क करूनही तोडगा निघाला नव्हता. या योजनेचा परतावा ४५ दिवसांच्या आत मिळत नसल्यामुळे या योजनेंतर्गत उपचार करण्याबाबत खासगी रुग्णालयांकडून नकारात्मक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरलेली महात्मा फुले योजना निधीच्या टंचाईत अडकली असल्यामुळे खासगी रुग्णालये निधीसाठी सरकारकडे मागणी करत आहेत.