खाजगी आस्थापनातील कामगार बजावणार मतदानाचा अधिकार
७ फेब्रुवारीला कामगारांना मिळणार ‘भरपगारी सुट्टी’; प्रशासनाचे कडक निर्देश
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार ही तरतूद करण्यात आली आहे.
सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व दुकाने, निवासी हॉटेल्स आणि खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापारी आणि औद्योगिक उपक्रम, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि रिटेलर्स या सर्व आस्थापनांना हे नियम पाळावे लागतील. विशेष म्हणजे, एखादा कर्मचारी निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असेल, परंतु त्याचे नाव मतदान क्षेत्रात मतदार म्हणून नोंदणीकृत असेल, तर त्यालाही मतदानासाठी सुट्टी देणे अनिवार्य आहे.
ज्या आस्थापनांमध्ये पूर्ण दिवस सुट्टी देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही किंवा जिथे काम थांबल्यास मोठ्या नुकसानीची शक्यता आहे (उदा. अत्यावश्यक सेवा), अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना पूर्ण सुट्टीऐवजी २ ते ३ तासांची विशेष सवलत देण्यात यावी. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मतदाराला मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही, याची दक्षता मालकांनी घेणे आवश्यक आहे.
जर एखाद्या कर्मचाऱ्याने सुट्टी किंवा सवलत न मिळाल्यामुळे मतदान करता आले नाही अशी तक्रार केली, तर संबंधित मालकाविरुद्ध किंवा नियोक्त्याविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कारखाने आणि दुकानांच्या व्यवस्थापनाने या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन कामगार आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.