सायले येथे हातभट्टीवर छापा
रत्नागिरी, ता. ४ ः सायले-देवरुख (ता. संगमेश्वर) येथे जांभ्या चिऱ्याच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ९२० रुपयांची आठ लिटर दारु जप्त केली. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर गंगाराम पांचाळ (वय ६३, रा. सायले-पांचाळवाडी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३) दुपारी बाराच्या सुमारास पांचाळवाडीत जाणाऱ्या जांभ्या दगडाच्या पाखाडीवर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वृद्ध प्रभाकर पांचाळ हे विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळगलेल्या स्थितीत सापडले. या प्रकरणी पोलिस हवालदार अभिषेक वेलणकर यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.