रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा दुहेरी गौरव
‘बेस्ट बँक’ आणि ‘इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इअर’ पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मे. इ प्लस इंटेलेक्च्युअल मीडिया, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘को-ऑप. बँक्स टॉप १०० समिट २०२५’ मध्ये बँकेला ‘बेस्ट बँक ऑफ द इअर’ आणि ‘इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इअर’ या दोन महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. खोपोली येथील हॉटेल नोवोटेलमध्ये पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते बँकेच्या प्रतिनिधींनी हे पुरस्कार स्वीकारले.
बँकेने गेल्या काही वर्षांत आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल बँकिंग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे. जिल्ह्यात १९ एटीएम सेंटर्स आणि विविध डिजिटल सेवांच्या माध्यमातून बँकेने ग्राहकांना अद्ययावत बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आर्थिक निकषांवरही बँकेने आपली पकड मजबूत ठेवली असून, ३१ मार्च २०२५ अखेर बँकेने ५ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, बँकेला सलग १५ वर्षे ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून, गेली १३ वर्षे नक्त एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखण्यात बँकेला यश आले आहे.
या यशाचे श्रेय बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीला दिले जात आहे. पुरस्कार स्वीकारताना बँकेचे संचालक श्री. एम. एस. टिळेकर, श्री. आर. जी. गराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर, सरव्यवस्थापक श्री. समीर दळवी आणि उपसरव्यवस्थापक श्री. संतोष खेडसकर उपस्थित होते. या सोहळ्याला इंडियन बँकिंग असोसिएशनचे डेप्युटी सीईओ श्री. गोपाळ भगत, रिझर्व्ह बँकेचे संचालक श्री. सतीष मराठे यांसह बँकिंग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
तळागाळातील जनता आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध असलेल्या या बँकेवर आता सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.