मत्स्य व्यवसायाला हवामान बदलाचा फटका
गुहागर: वाढते वादळी वारे, सतत बदलणारे हवामानआणि समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती यांचा थेट परिणाम मासेमारी व्यवसायावर होत असून, मासळीच्या आवकेत लक्षणीय घट झाली आहे. यामुळे घाऊक व किरकोळ बाजारात मासळीच्या दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, आधीच भाज्यांच्या वाढलेल्या दरांनी त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचे मासिक बजेट अधिकच कोलमडू लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकर वाडा आणि हरणई या बंदरांसह उरण तालुक्यातील करंजा, मोरा, दिघोडे, आवरे या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर खोल समुद्रातील मासेमारी केली जाते.
करंजा येथे नव्याने सुरू झालेल्या करंजा-द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय बंदरात सध्या मासळीची आवक घटलेली दिसून येत आहे. सायंकाळच्या सुमारास भरणाऱ्या बाजारात करंदी, कोलंबी, पापलेट, सुरमई, रावस, कलेट, हलवा, कुपा, बोबील आदी सुमारे ३० ते ४० प्रकारचे मासे विक्रीसाठी उपलब्ध असले, तरी त्याचे प्रमाण मर्यादित आहे. या बंदरात मासळीचे दर १०० रुपयांपासून बेट १२०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही मासळीची टंचाई निर्माण झाली आहे.
मात्र पापलेट, सुरमई, कोलंबी, कुषा आणि कलेट या माशांना मोठी मागणी असल्याने त्यांचे दर अधिक कडाडले आहेत. रायगडच्या खोल समुद्रातील मासळी, पापलेट आणि सुरमई हे खवय्यांचे आवडते मासे मानले जातात. मात्र सध्या या माशांचे दर गगनाला भिडल्याने खवय्यांना खाण्यावर मुरड घालावी लागत आहे. एका पापलेटच्या नगासाठी १२०० ते १४०० रुपये, सुरमईसाठी ८५० ते १००० रुपये किलो, कोलंबीसाठी ४५० ते ५०० रुपये, तर हलव्यासाठी ५०० ते ५५० रुपये मोजावे लागत आहेत. सागरी किनाऱ्यावरील हजारो मासेमारी बोटी बंदरातच नांगरून ठेवण्यात आल्या असून, समुद्रात जाणे धोकादायक ठरत आहे.
परंपरागत आहार असलेल्या मासळीसाठी जादा पैसे
उरण परिसरातील खाडीकिनाऱ्यावर पूर्वी निवटे, खरख्या खुबे, माकोल, कोळीम, ताजी कोलंबी यांसारखी स्थानिक मासळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असे. मात्र सध्या या स्थानिक माशांचे प्रमाणही घटल्याने दरात प्रचंड वाढ झाली आहे, परंपरागत आहार असलेल्या मासळीकरिता आता जादा पैसे मोजावे लागत आहेत, अशी प्रतिक्रिया खवय्यांनी व्यक्त केली. हवामान स्थिर झाल्यानंतरच मासळीच्या बाजारात दिलासा मिळेल, अशी आशा व्यापारी आणि ग्राहक दोघेही व्यक्त करत आहेत.