परशुराम कदमांची पक्षातून हकालपट्टीनंतर मुन्ना देसाईंचा युवासेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा
रत्नागिरी:
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत रत्नागिरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेने शिस्तभंगाची मोठी कारवाई करत युवासेना कोकण विस्तारक परशुराम मारुती कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या कारवाईचे पडसाद उमटताच अवघ्या काही वेळातच युवासेना जिल्हाप्रमुख श्री. केदार उर्फ मुन्ना देसाई यांनीही आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील ३५-हातखंबा जिल्हा परिषद गटातून शिवसेनेने सुयोग नंदकुमार कांबळे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, पक्षाचा हा निर्णय डावलून युवासेना कोकण विस्तारक परशुराम कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ते अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवत असल्याने पक्ष संघटनेच्या शिस्तीचे उल्लंघन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी अधिकृत पत्रक काढून परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याचे जाहीर केले.
परशुराम कदम यांच्यावरील कारवाईनंतर काही वेळातच युवासेनेचे आक्रमक नेते आणि रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख मुन्ना देसाई यांनी आपला राजीनामा राहुल पंडित यांच्याकडे सुपूर्द केला. पत्रात त्यांनी ‘वैयक्तिक अडचणींचे’ कारण दिले असले, तरी परशुराम कदम यांच्या हकालपट्टीच्या निर्णयाशी हा राजीनामा जोडला जात आहे. मुन्ना देसाई हे युवासेनेचा अत्यंत सक्रिय चेहरा असल्याने निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
या दुहेरी घडामोडींमुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. “शिस्त पाळा, अन्यथा कारवाईला सामोरे जा,” असा कडक संदेश जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी या कारवाईतून दिला असला तरी, मुन्ना देसाईंच्या राजीनाम्यामुळे आता युवासेनेची धुरा कोणाकडे जाणार आणि हातखंबा गटातील निवडणुकीचे समीकरण कसे बदलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.