तबला विषयात केदार लिंगायत अलंकार पूर्ण परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या अलंकार परीक्षेत रत्नागिरीतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
रत्नागिरी : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या गायन, वादन आणि नृत्य अलंकार परीक्षेत रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये तबला विषयात केदार लिंगायत हे अलंकार पूर्ण परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांना गुरु पंडित आमोद दंडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
वडील कै. कृष्णा लिंगायत उत्तम साथसंगत करत असल्याने लहानपणापासूनच केदार यांना वादनाचे बाळकडू मिळाले आहे; मात्र २००४ पासून केदार यांनी तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सुरवातीला कै. विनायकबुवा रानडे, हेरंब जोगळेकर, प्रसाद करंबेळकर आणि सध्या पं. आमोद दंडगे यांच्याकडे तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेत आहेत. २०१३ पासून ते रियाज तबला अकॅडमी आणि स्वरनिनाद संगीत विद्यालय आणि रियाज तबला अकॅडमीच्या माध्यमातून वादनाची आवड असलेल्यांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच मुकुल माधव विद्यालय आणि जीजीपीएस स्कूल मधील कै. यशवंतराव पटवर्धन संगीत अकॅडमी मध्ये तबला संगीत शिक्षक म्हणून कार्य करत आहेत. सध्याच्या घडीला सुमारे १५० विद्यार्थी केदार लिंगायत यांच्याकडे तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेत आहेत. त्यांचे आतापर्यंत ११ विद्यार्थी तबला विशारद झाले आहेत. अजून खूप शिकून रत्नागिरीत तबल्यात नवीन पिढी घडवण्याचा मानस आहे.
त्याचप्रमाणे अलंकार प्रथम तबला परीक्षेत निखिल रानडे हे उत्तीर्ण झाले. गायन विषयात मयुरेश जायदे हे अलंकार प्रथम परीक्षा उत्तीर्ण झाले. तर कथक विषयातून दर्शना लोध-कामेरकर यांच्या विद्यार्थिनी आसावरी आखाडे (अलंकार पूर्ण), मृणाली डांगे (अलंकार पूर्ण), अनुजा गांधी (अलंकार पूर्ण), धनश्री मुरकर (अलंकार प्रथम), रुपाली करमरकर (अलंकार प्रथम) तसेच गुरु शिल्पा मुंगळे यांच्या विद्यार्थिनी आकांक्षा साळवी (अलंकार पूर्ण), सोनम जाधव (अलंकार पूर्ण) उत्तीर्ण झाल्या.
उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.