हातीस उरुसात ‘संपर्क युनिक फाउंडेशन’कडून माणुसकीचे दर्शन; भाविकांसाठी मोफत रुग्ण सेवा सुविधा उपलब्ध
रत्नागिरी (प्रतिनिधी): कोकणातील श्रद्धेचे स्थान आणि जनसागराचे आकर्षण ठरलेला रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील पीर बाबर शेख यांचा उरूस यंदा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संपर्क युनिक फाउंडेशन (NGO), रत्नागिरी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विनामूल्य रुग्ण सेवा आणि प्रथमोपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
२ आणि ३ फेब्रुवारी २०२६ या दोन दिवसांच्या कालावधीत रंगणाऱ्या या उरुसासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक हजेरी लावतात. प्रचंड गर्दी आणि प्रवासाचा थकवा यामुळे अनेकदा भाविकांना किरकोळ दुखापत किंवा अचानक उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. अशा आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळावी, या सामाजिक जाणिवेने संपर्क युनिक फाउंडेशनने आपले मदत केंद्र उरुस परिसरात उभारले आहे. विशेष म्हणजे, सामाजिक बांधिलकी जपत फाउंडेशनचे हे रुग्ण सेवेचे सलग आठवे वर्ष आहे.
या सेवा केंद्राचा अधिकृत शुभारंभ फाउंडेशनच्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष शकील गवाणकर, रत्नागिरी जिल्हा समिती अध्यक्ष जमीर खलफे, आणि सचिव युसुफ शिरगावकर प्रामुख्याने उपस्थित होते. “श्रद्धेच्या या महाकुंभात सहभागी होणाऱ्या कोणत्याही भाविकाला वैद्यकीय कारणास्तव त्रास होऊ नये, हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे,” अशी भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या स्तुत्य उपक्रमासाठी हातीस ग्राम विकास मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. उरुस काळात जर कोणालाही आकस्मिक वैद्यकीय उपचारांची किंवा प्रथमोपचाराची गरज भासली, तर त्यांनी विनाविलंब या केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क युनिक फाउंडेशनच्या या निरंतर सेवेमुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
