रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा ‘मिशन परिपूर्ती’ उपक्रम; डायल ११२ च्या तक्रारदारांना आता थेट मिळणार प्रतिसाद
रत्नागिरी: नागरिक केंद्रित पोलीसिंग आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन परिपूर्ती’ हा नवा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मोहिमेमुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत मागणाऱ्या नागरिकांना खरोखरच अपेक्षित सेवा मिळाली आहे की नाही, याची खात्री आता वरिष्ठ पातळीवरून केली जात आहे. अनेकदा नागरिक संकटकाळात किंवा मदतीसाठी डायल ११२ या प्रणालीवर संपर्क साधतात. ही प्रणाली केंद्रिय स्तरावरून स्थानिक पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचते आणि पोलीस अंमलदार संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचून मदत करतात. मात्र, ही मदत मिळाल्यानंतर तक्रारदाराचे पूर्ण समाधान झाले आहे का, हे जाणून घेण्याची कोणतीही थेट व्यवस्था यापूर्वी उपलब्ध नव्हती. हीच उणीव भरून काढण्यासाठी २९ ऑगस्ट २०२५ पासून जिल्ह्यात ‘मिशन परिपूर्ती’ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्षात एक विशेष सेल स्थापन करण्यात आला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती डायल ११२ वर कॉल करते, तेव्हा पोलीस ठाण्याचे पथक तिथे जाऊन आल्यानंतर काही वेळाने हा विशेष सेल संबंधित कॉलरला पुन्हा फोन करतो. पोलिसांकडून योग्य मदत मिळाली का, समस्येचे निराकरण झाले का आणि पोलिसांची वागणूक कशी होती, याबाबतचा थेट फीडबॅक या माध्यमातून घेतला जातो. या सर्व नोंदी एका स्वतंत्र नोंदवहीमध्ये ठेवल्या जातात. विशेष म्हणजे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि स्वतः पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे या नोंदींचे दररोज नियमित मॉनिटरिंग करतात. जर एखाद्या तक्रारदाराने असमाधान व्यक्त केले, तर पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या समस्येचे शंभर टक्के निराकरण करण्यावर भर दिला जातो.
आतापर्यंत या मिशन अंतर्गत २,७८२ कॉलर्सचा अभिप्राय घेण्यात आला असून त्या सर्वांच्या समस्यांचे पूर्णपणे निराकरण करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पोलीस आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत निःसंकोचपणे डायल ११२ या सेवेचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच या उपक्रमात काही त्रुटी आढळल्यास त्याबाबतही थेट प्रशासनास कळवावे, जेणेकरून पोलीस सेवेचा दर्जा अधिक सुधारता येईल, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.