तालुक्यात 1 लाख 4 हजार महिला मतदार, तालुक्यात 271 मतदान केंद्र
रत्नागिरी : ग्रामीण भागाच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात एकूण २ लाख ४ हजार ४९६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख ४५ पुरुष मतदार, तर १ लाख ४ हजार ४४१ महिला मतदार आहेत. मतदानासाठी तालुक्यात एकूण २७१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘सखी’ मतदान केंद्रे, दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र केंद्रे आणि काही ‘आदर्श’ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंगच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार असल्याची माहिती जीवन देसाई यांनी दिली.
उपविभागीय दंडाधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत जीवन देसाई यांनी या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम आणि प्रशासकीय तयारीविषयी सांगितले. ते म्हणाले, रत्नागिरी तालुक्यात एकूण १० जिल्हा परिषद गट आणि २० पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, प्रशासनाने यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, १६ जानेवारी रोजी निवडणुकीची अधिकृत सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 21 जानेवारी पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. मात्र १८ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. २२ जानेवारी रोजी प्राप्त अर्जांची छाननी केली जाईल. तर २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. निवडणुकीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच मतदान ५ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन १० फेब्रुवारीपर्यंत नवनिर्वाचित सदस्यांची नावे अधिकृतरीत्या जाहीर केली जातील.
प्रशासकीय यंत्रणा आणि आचारसंहिता
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी एकूण ७०७ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. यामध्ये ३४ क्षेत्रीय अधिकारी, २९८ मतदान केंद्राध्यक्ष आणि २८१ मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संपूर्ण तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक खर्चावर मर्यादा घालण्यात आली आहे. जिल्हा परिषद गटातील उमेदवाराला ६ लाख रुपये, तर पंचायत समिती गणाातील उमेदवाराला ४.५० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी आहे. निवडणूक अर्जांची छाननी उपविभागीय अधिकारी कार्यालयात होईल, तर मतमोजणी कुवारबांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडणार आहे. ईव्हीएम मशीनची तपासणी पूर्ण झाली असून, गरजेनुसार ११० टक्के यंत्रांची उपलब्धता प्रशासनाकडून करण्यात आली आहे.