रत्नागिरीत साळवी स्टॉप येथील कचरा डेपोला भीषण आग; धुराच्या लोटामुळे परिसरात घबराट
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप परिसरात असलेल्या नगर परिषदेच्या कचरा डेपोला आज अचानक भीषण आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साळवी स्टॉप येथे शहराचा संपूर्ण कचरा संकलित केला जातो. आज अचानक या डेपोतून आगीचे लोळ उठू लागल्याने खळबळ उडाली. वाऱ्याच्या वेगामुळे आग वेगाने पसरली आणि काही वेळातच संपूर्ण परिसरात धूर पसरला. या धुरामुळे नजीकच्या वस्तीमधील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून, दृश्यमानता कमी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि नगरपरिषदेचे कर्मचारी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. कचऱ्यामध्ये प्लास्टिक आणि ज्वालाग्राही वस्तूंचे प्रमाण जास्त असल्याने आग विझवताना अडचणी येत आहेत.
साळवी स्टॉप कचरा डेपो येथे नगरपरिषदेचे कर्मचारी कायमस्वरूपी कार्यरत असतात. कर्मचाऱ्यांची उपस्थिती असतानाही एवढी मोठी आग लागलीच कशी, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ही आग नैसर्गिक कारणाने लागली की कुणी जाणीवपूर्वक लावली, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
“आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्यातरी आमचे मुख्य लक्ष आग पूर्णपणे विझवण्यावर आहे. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल,” असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. मात्र, आगीमुळे झालेल्या प्रदूषणामुळे साळवी स्टॉप आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
