11 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक रिंगणे गावात
रत्नागिरी : कोकणातील ग्रामीण साहित्य चळवळीला नवी दिशा देणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकीचे अधिष्ठान असलेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई यांच्या अनुज्ञेने यंदाचे 11 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन लांजा तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य व ऐतिहासिक रिंगणे गावात आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन दि. 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
याबाबतची माहिती राजापूर लांजा तालुका नागरिक संघांचे अध्यक्ष सुभाष लाड, सरचिटणीस स्नेहल आयरे, सदस्य काशिनाथ चव्हाण उपस्थित होते. सन 1953 मध्ये मुंबईतील दादर येथील कोतवाल उद्यानात राजापूर-लांजा तालुक्यातील चाकरमान्यांनी आपल्या मायभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाची स्थापना केली. एकविसाव्या शतकात बदलत्या सामाजिक गरजांनुसार संघाने नव्या पिढीसाठी शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना सुरुवात केली. दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना, मार्गदर्शन शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक कार्यकर्त्यांचे गौरव तसेच नवोदित साहित्यिकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ग्रामीण साहित्य संमेलनांची परंपरा संघाने यशस्वीपणे जपली आहे. आज ही संस्था आपल्या रचनात्मक कार्यातून राजापूरलांजा तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचली आहे.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील समृद्ध इतिहास, निसर्ग, लोकसंस्कृती आणि लोककलेला नव्याने उजाळा मिळणार आहे. ला. कृ. आयरे साहित्य नगरीत होणाऱ्या या संमेलनात नामवंत साहित्यिक, इतिहासकार यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार असून, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, व्याख्याने, काव्यसंमेलन, नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम, विविध पुरस्कार वितरण अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला यशस्वी करण्यासाठी संघाचे मुंबईतील व स्थानिक कार्यकर्ते तसेच रिंगणे व परिसरातील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात साहित्यिक, कलाकार, विद्यार्थी व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.