मराठी पत्रकार दिनानिमित्त रत्नागिरीत पत्रकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
रत्नागिरी:
मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी आणि इंफिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, ६ जानेवारी रोजी विशेष नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. साळवी स्टॉप येथील इंफिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या या शिबिराला रत्नागिरीतील पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पत्रकारितेच्या क्षेत्रात अहोरात्र काम करणाऱ्या वार्ताहरांच्या आरोग्याची, विशेषतः डोळ्यांची काळजी घेण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने पत्रकारांच्या डोळ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी इंफिगो हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. यावेळी शहरातील विविध माध्यमांतील पत्रकारांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली.
दिवसभर चाललेल्या या शिबिरात डॉक्टरांनी पत्रकारांना संगणक आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम टाळण्यासाठी मोलाचे मार्गदर्शनही केले. मराठी पत्रकार परिषदेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
