रस्ता रोको आंदोलनात बळीराज सेना उतरणार
सुरेश भायजे; ११ रोजी हायवे जनअक्रोश समितीचे आयोजन
संगमेश्वर: चौपदरीकरणाच काम संगमेश्वर तालुक्यात अतिशय मंद गतीने चालू असून त्याचा फटका निरपराध प्रवाशांना, येथील जनतेला बसत आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे . सरकार, शासन आणि प्रशासन हे जाणीवपूर्वक जनतेला वेठीस धरण्यासाठीच महामार्गाचे काम धिम्या गतीने चालू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .याचा निषेध करण्यासाठी ११ जानेवारी २०२६ रोजीच्या हायवे जन आक्रोश समितीने आयोजित केलेल्या रस्ता रोको आंदोलनात बळीराज सेना सर्व ताकतीनिशी उतरणार असल्याचे मत बळीराज सेनेचे उपाध्यक्ष सुरेश भायजे यांनी पत्रकारांना सांगितले.
ते पुढे म्हणाले की,आरवली येथे नव्याने बांधलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील पुलाच्या चिपळूण मुंबईकडे जाणाऱ्या डाव्या बाजूचा सर्व्हिस रोड १० जानेवारी २५रोजी उखडून ठेवण्यात आला तेव्हापासून तब्बल एक वर्ष वाहतुकीस बंद आहे. केवळ ५० ते ६० मीटर काँक्रिटीकरण राहिल्यामुळे च हा मार्ग बंद गेले वर्षभर बंद आहे. गणपती उत्सवात संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी तातडीने डाव्या बाजूकडील सर्व्हिस रोड चे काम पूर्ण करून देतो सुरू करून देतो असे संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी सांगितले होते. मात्र गणपती गेले, दिवाळी गेली आता १० जानेवारीला तब्बल एक वर्ष होईल, या एका वर्षात आरवली पंचक्रोशीतील अनेक प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागला आहे. केवळ ५० ते ६०मीटर अपूर्ण रस्त्या अभावी तब्बल २०० मीटरची पायपीट प्रवाशांना दगड मातीतून पावसाळी चिखलातून करावी लागली आहे. अनेक प्रवासी हायवेवर जाण्यासाठी भरावातून चालताना घसरून पडलेले आहेत. चिपळूण मुंबईकडे जाणारी वाहन पुलावरूनच जात असल्याने रात्री अपरात्री अंधारातून चाचपडत शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांना,महिला अबाल वृद्ध प्रवाशांना अनेक यातना सोसाव्या लागल्या आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांबाबतीत प्रचंड आक्रोश येथील जनतेत आहे. आरवली येथील शेकडो वर्षाचा इतिहास असणाऱ्या वैज्ञानिक दृष्टीने अन्यन्य साधारण महत्व असणाऱ्या गंधक युक्त गरम पाण्याच्या कुंडाची नासाडी करण्यात आली आहे.प्रसिद्ध क पर्यटन क्षेत्र असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडावर जाण्या_ येण्यासाठीचा मोरी खालील पादचारी मार्ग बंद करण्यात आलेला आहे. कुंडावरून केदारनाथ मंदिरात जाण्याचा मार्ग देखील या अधिकारी व ठेकेदाराने बंद केलेला आहे. याबाबतीत वारंवार ग्रामस्थांनी आवाज उठवूनही त्यांची दखल घेण्यात आलेली नाही.
आरवली ते संगमेश्वर दरम्यान ब्रिटिश कालीन महामार्गावर तब्बल तेरा ठिकाणी कमानी मोऱ्या बांधण्यात आल्या होत्या. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या गुराढोरांना जाण्या येण्यासाठी अत्यंत सोयीचे झाले होते, वन्य प्राण्यांना देखील जाण्यास सोयीचे झाले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यानी ब्रिटिश कालीन सर्व मोऱ्या तोडून त्याच जागी तीन ,साडेतीन फुटी पाईप मोऱ्या टाकल्या आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांपासून सर्वांचीच मोठी गैरसोय झाली आहे. रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचे रान डुकरे, संबरांचे कळप महामार्ग ओलांडून जाताना वाहनानी उडवण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. आरवलीत बिबट्या वाघ महामार्गावरून पलीकडे जाताना अज्ञात वाहनाने उडवल्यामुळे मृत्युमुखी पडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ब्रिटिश इंजिनिअर ना वन्य प्राण्याबद्दल ,शेतकऱ्यां बद्दल जी सहानुभूती होती ती सहानुभूती भारतीय इंजिनीयर ना असू नये ही दुर्दैवी बाब आहे.
गेल्या वर्षभरात अपूर्ण महामार्ग चौपदरीकरणामुळे आरवली ते संगमेश्वर दरम्यान सहा मोटरसायकल चालवणाऱ्या तरुणांचा अपघातात हकनाक बळी गेलेला आहे. ११ रोजी सत्याग्रही मार्गाने रस्ता रोको आंदोलन यशस्वी न झाल्यास जेलभरोची देखील तयारी असल्याचे मत श्री भायजे यांनी पत्रकारांना सांगितले.