भूमी अभिलेखच्या दिरंगाईविरोधात शेतकरी आक्रमक
२६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
रत्नागिरी: जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन आणि स्वतः प्रशासनाने चूक मान्य करूनही जमिनीच्या नकाशातील दुरुस्ती न केल्याने, कसोप येथील ६० वर्षीय शेतकरी देवेंद्र शेलार यांनी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. भूमी अभिलेख विभागाच्या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी शेलार यांनी २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
देवेंद्र शेलार यांची कसोप (ता. रत्नागिरी) येथे स्वतःच्या मालकीची स्वतंत्र जागा आहे. या जागेच्या नकाशात उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून चुकीची नोंद करण्यात आली होती. ही चूक दुरुस्त व्हावी यासाठी त्यांनी २१ जानेवारी २०२४ रोजी पहिला अर्ज केला होता. विशेष म्हणजे, भूमी अभिलेख विभागाने आपली चूक लेखी मान्यही केली आहे; मात्र मागील दोन वर्षांपासून दुरुस्तीसाठी ‘न्यायालयाचा अभिप्राय हवा’ असे तांत्रिक कारण पुढे करून हे प्रकरण प्रलंबित ठेवले असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.
या प्रकरणी शेलार यांनी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने स्थळपाहणी आणि फेरमोजणी करून कार्यवाही करण्याचे कडक आदेश दिले होते. त्यानुसार २५ नोव्हेंबर रोजी फेरमोजणीची प्रक्रिया पार पडली, मात्र आजही महिना उलटून गेल्यानंतरही शेलार यांना दुरुस्त नकाशा मिळालेला नाही.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार हेलपाटे मारूनही केवळ टाळाटाळ केली जात असल्याने शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. शेवटी न्याय मिळत नसल्याने त्यांनी प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात त्यांच्यासोबत ॲड. गौरव शेलार हे देखील सहभागी होणार असून, जोपर्यंत नकाशा दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.