शोभना कांबळे यांना पत्रकार सन्मान,नंदकुमार सुर्वे यांना छायाचित्रकार सन्मान पुरस्कार
पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशनचे पुरस्कार जाहिर
रत्नागिरी दि.३ प्रतिनिधी
पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने यंदाचा पत्रकार सन्मान पुरस्कार दैनिक लोकमतच्या ज्येष्ठ महिला पत्रकार शोभना कांबळे यांना तर वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार लांजा तालुक्यातील नंदकुमार सुर्वे यांना जाहीर झाला आहे.पुरस्काराचे वितरण पत्रकार दिनी ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अ.के.देसाई हायस्कूल रत्नागिरी येथे होणार असल्याची माहिती पॉवर ऑफ मिडिया फाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष दुर्गेश आखाडे यांनी सांगितले.
पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशनचे पुरस्कार वितरणाचे हे पाचवे वर्ष आहे.ज्येष्ठ महिला पत्रकार शोभना कांबळे २६ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत आहेत.दैनिक कोकण गर्जना,दैनिक पुढारी आणि सध्या लोकमत मध्ये त्या कार्यरत आहेत.साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे.
बातमीपेक्षा अनेक वेळा छायाचित्र अधिक बोलते.असे वृत्तपत्र छायाचित्रकार दुर्लक्षित रहातात.त्यामुळे संघटनेने यंदा वृत्तपत्र छायाचित्रकाराला पुरस्कार देण्याचे निश्चित केले.लांजा येथील वृत्तपत्र छायाचित्रकार नंदकुमार सुर्वे यांना वृत्तपत्र छायाचित्रकार सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.त्या यापूर्वी दैनिक तरूण भारत आणि दैनिक प्रहार मध्ये पत्रकार म्हणून काम केले आहे.
पुरस्कार वितरणाप्रसंगी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी,जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते,अ.के.देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली पिलणकर उपस्थित रहाणार आहेत.
स्पर्धा परिक्षेवर व्याख्यान
शालेय जीवनात विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तोंडओळख व्हावी या उद्देशाने गेली चार वर्ष पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन स्पर्धा परीक्षेवर व्याख्यानमाला आयोजित करत आहे.स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? याविषयावर अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.