भोस्ते घाटात दाट धुक्यामुळे कार उलटली
सुरक्षा भिंतीवर आदळल्याने ९ प्रवासी बचावले
खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील भोस्ते घाटात आज पहाटे 4.30 वा सुमारास एक भीषण अपघात झाला. मुंबईहून संगमेश्वरच्या दिशेने जात असलेल्या एर्टिगा कारला घाटातील तीव्र वळणावर दाट धुक्यामुळे वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट महामार्गावरील सुरक्षा भिंतीवर जाऊन आदळली. धडकेनंतर गाडी रस्त्यावरच उलटली, त्यामुळे काही काळ परिसरात वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.
या वाहनात एकूण नऊ जण प्रवास करत होते. त्यामध्ये सहा प्रौढ आणि तीन लहान मुलांचा समावेश होता. अपघातात एक जण जखमी झाला असून इतर प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याचे सांगण्यात येत आहे. गाडी उलटल्यामुळे आत अडकलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वाहनातील महिलांनी प्रसंगावधान राखत गाडीच्या काचा फोडून स्वतःची आणि इतर प्रवाशांची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजण संगमेश्वर येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली उभी असलेली श्री जगद्गुरु नरेंद्रचार्यजी संस्थान नानिजधाम यांच्या २४ तास सेवेत तत्पर असलेल्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्राथमिक उपचार देत उपजिल्हा रुग्णालय, कळंबनी येथे दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक संथ झाली होती. स्थानिक नागरिक आणि मदत पथकांच्या सहकार्याने वाहन रस्त्याच्या कडेला करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र महामार्गावर दाट धुके आणि तीव्र वळणे असल्याने वाहनचालकांनी वेग मर्यादेत ठेवून अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.