रत्नागिरीत ‘१०८’ रुग्णवाहिका ठरली जीवनदूत; ११ वर्षांत ४९२ मातांची रुग्णवाहिकेतच सुरक्षित प्रसूती
रत्नागिरी: आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांसाठी वरदान ठरलेली ‘१०८’ ही रुग्णवाहिका सेवा रत्नागिरी जिल्ह्यात खऱ्या अर्थाने ‘जीवनदायिनी’ ठरत आहे. वेळेवर रुग्णालयात पोहोचणे शक्य न झाल्यामुळे गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत या रुग्णवाहिकेमध्येच ४९२ मातांची सुरक्षित प्रसूती करण्यात आली आहे. दुर्गम भागात ही सेवा पोहोचत असल्याने ग्रामीण जनतेसाठी ही रुग्णवाहिका मोठा आधार ठरली आहे.
२.४६ लाख रुग्णांना जीवदान केवळ प्रसूतीच नव्हे, तर रस्ते अपघात, हृदयविकार आणि इतर गंभीर आजारांत या सेवेने आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख ४६ हजार ६७२ रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या केवळ ११ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल २४ हजार १६ आपत्कालीन रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. याच वर्षात ४ महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच यशस्वीपणे पार पडली.
जिल्ह्यात १७ रुग्णवाहिकांचे जाळे रत्नागिरी जिल्ह्यात २६ जानेवारी २०१४ रोजी या सेवेचा प्रारंभ झाला. सध्या जिल्ह्यात एकूण १७ रुग्णवाहिका १०८ क्रमांकावर अहोरात्र सेवा देत आहेत. मात्र, जिल्ह्याचा विस्तार आणि दुर्गम ग्रामीण भागाचा विचार करता, अजूनही किमान १५ रुग्णवाहिकांची गरज असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर एकीकडे ही सेवा रुग्णांचे प्राण वाचवत असतानाच, दुसरीकडे रुग्णवाहिकांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न गंभीर होत आहे. नेमण्यात आलेल्या एजन्सीकडून वेळेवर दुरुस्ती होत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. या अत्यावश्यक सेवेमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी शासनाने यावर कडक नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.