चिपळुणात काँग्रेस सोबत नसल्याचा आघाडीला फटका
सुधीर शिंदेंनी घेतली १,०४८ मते; लियाकत शाह हेही ठरले रमेश कदम यांच्यासाठी अडथळा
चिपळूण
राज्य पातळीवर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसला येथील नगर परिषद निवडणुकीत नाकारणे आघाडीला चांगलेच भारी पडले आहे. काँग्रेसने आपले तीन नगरसेवक निवडून आणतानाच नगराध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार सुधीर शिंदे यांनीही १,०४८ घेतली. याचबरोबर बंडखोर अपक्ष उमेदवार लियाकत शाह यांनीही १,६३२ मते मिळवल्याने काँग्रेससह ते रमेश कदम यांच्यासाठी अडथळा ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून अगदी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत येथे महाविकास आघाडीसह महायुती करायची की नाही, याचा अंतिम निर्णय होत नव्हता. शेवटच्या क्षणी अजित पवार राष्ट्रवादीला बाजूला सारत भाजप व शिवसेनेने युती केली. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेना तीन नगरसेवक निवडून आणतानाच यांनी महाविकास आघाडीतील मुख्य असलेल्या काँग्रेसला सुरुवातीपासूनच चर्चेत सहभागी करून घेतले नाही. त्यामुळे या पक्षाने स्वतंत्र्य लढण्याची तयारी अगोदरपासूनच ठेवली होती. मात्र याही पक्षात काही घडामोड घडल्याने फूट पडली. तरीही हाताच्या चिन्हांवर १२ उमेदवार उभे करण्याचे काम जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी करत त्यांना आपल्या परीने ताकद देण्याचा प्रयत्न केला.
ज्या-ज्या ठिकाणी शक्य झाले, तेथे काँग्रेसने जोरदार प्रचार केला. याचे फलित म्हणून साजिद सरगुरोह, सफा गोठे, मिस्बाह नाखुदा हे तीन उमेदवार चांगली मते घेत विजयी झाले. तसेच नगराध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार सुधीर शिंदे यांनी १,०४८ मते घेतली. काँग्रेसला ३ नगरसेवक विजयी करता आले. मात्र ज्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने या पक्षाला आघाडीत घेताना नकारात्मक भूमिका घेतली, त्यांचे मात्र दोनच नगरसेवक निवडून आले आहेत. याचा अर्थ काँग्रेसची ताकद वाढल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्यातही अंतर्गत कलह झाला नसता तर कदाचित आणखी काही नगरसेवक निवडून आणणे त्यांना शक्य झाले असते.
तसेच ऐनवेळी काँग्रेसला हात दाखवून अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाच्या रिगणात राहिलेल्या लियाकत शाह यांनीही १,६३२ मते मिळवली, मात्र युतीचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ हे १,२८१ मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे शाह व शिंदे यांच्या मतांची बेरीज केल्यास ती २,६५० होते. याचा अर्थ काँग्रेसला नाकारणे, शाह यांची समजूत न काढणे हे आघाडीचे पराभूत उमेदवार रमेश कदम यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहे. त्यामुळे यापुढे शहरात काँग्रेसला नाकारताना इतर पक्षांना विचार करावा लागणार आहे.