‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ उपक्रम राबवणार : उमेश सकपाळ
नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा उत्साहात
चिपळूण : माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून चिपळूणवासीयांनी मला नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. हा विश्वास आणि उपकार मी कधीही विसरणार नाही. मी २४ तास नागरिकांचा सेवक म्हणून काम करेन, अशी ग्वाही चिपळूण नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या धर्तीवर ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हा उपक्रम राबवण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
चिपळूण नगर परिषदेत शिवसेना–भाजप–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा पदग्रहण सोहळा सोमवारी दुपारी उत्साहात पार पडला. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी प्रशासक म्हणून उमेश सकपाळ यांना पदभार स्वीकारून दिला. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप नेते प्रशांत यादव आदी मान्यवर उपस्थित होते. पदग्रहण सोहळ्यापूर्वी बहादुरशेख नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीने नगर पालिकेपर्यंत नगराध्यक्ष व मान्यवरांचे आगमन झाले.
यानंतर झालेल्या सत्कार व शुभेच्छा समारंभात बोलताना उमेश सकपाळ म्हणाले की, पदग्रहण सोहळ्यासाठी प्रखर उन्हात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आणि रॅलीत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. चिपळूणवासीयांनी मोठ्या विश्वासाने मला नगराध्यक्ष केले असून, या विश्वासापुढे मी नतमस्तक आहे.
आजचा दिवस माझ्या आयुष्यातील ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण आहे. माझी आई संगीता आज समोर बसली आहे, मात्र या क्षणी वडिलांची प्रकर्षाने आठवण येत आहे. आज मी नगराध्यक्ष झालो आहे, हे पाहण्यासाठी माझे वडील असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
चिपळूण नगरपालिकेला मोठा ऐतिहासिक वारसा असून नगराध्यक्षांची समृद्ध परंपरा आहे. या परंपरेतील ३६वा नगराध्यक्ष म्हणून मी पदभार स्वीकारला आहे. निवडणूक संपली असून आता राजकारण बाजूला ठेवून, जे माझ्यासोबत होते आणि जे विरोधात होते, अशा सर्वांना सोबत घेऊन चिपळूणच्या विकासासाठी काम करू. शहराला शोभेल अशी नगरपालिकेची भव्य वास्तू उभारण्याचा मानस आहे. यासाठी सर्व नगरसेवक, अधिकारी व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी विशाल भोसले होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, उमेश सकपाळ हे चिपळूण नगर परिषदेचे ३६वे नगराध्यक्ष आहेत. त्यांच्या विवाहावेळी त्यांचे आणि आरती सकपाळ यांचे ३६ गुण जुळले होते आणि आता नगर परिषदेतही नगराध्यक्षांसह २९ सदस्य, खासदार, आमदार, तीन स्वीकृत सदस्य आणि ३६वे मुख्याधिकारी असे मजबूत बांधून एकत्रितपणे शहराच्या विकासासाठी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चिपळूणमध्ये येणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना हे शहर आपले वाटावे आणि त्यांनी आपले शहर म्हणून काम करावे, यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. केवळ सोशल मीडियावर टीका व बदनामी न करता सकारात्मक सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. नगर परिषदेचे सर्व कर्मचारी व विभागप्रमुख चांगले काम करत असून, एक वर्षाचे स्पष्ट उद्दिष्ट ठेऊन काम केल्यास यश निश्चित मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सदानंद चव्हाण आणि प्रशांत यादव यांनीही आपली भाषणे केली. सर्वांनी उमेश सकपाळ यांचे अभिनंदन करत शहराचा सर्वांगीण विकास करून चिपळूणला स्मार्ट सिटीच्या दिशेने नेण्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सदानंद चव्हाण, प्रशांत यादव यांचीही समायोजित भाषणे झाली. सर्वांनी उमेश सकपाळ यांचे कौतुक करून आता चांगल्या पद्धतीने काम करा. शहराला स्मार्ट सिटी बनवा, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख रुपेश घाग, भाजपचे तालुकाप्रमुख विनोद भुरण, नगराध्यक्षांच्या सुविद्य पत्नी आरती सकपाळ, प्राजक्ता टकले, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेरडे, नगरसेविका सफ़ा गोठे, नगरसेवक अजय भालेकर, त्याचबरोबर प्रशांत मोहिते, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश सकपाळ, तालुका सचिव उमेश सकपाळ, शिवसेना तालुकाप्रमुख संदेश आयरे, माजी नगरसेवक विजय चितळे, विलास खेराडे, श्रीराम खरे, सारिका भावे, रुही खेडेकर, सुषमा कासेकर, रत्नदीप देवळेकर, डॉक्टर विजय रीळकर, डॉ. अब्बास जबले, रामदास राणे, उदय उतारी, सुनील जांभेकर आदी उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व शिवसेना-भाजप युतीसह अन्य पक्षांचे नगरसेवकही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरसेवक कपिल शिर्के यांनी केले.