उदय सामंत संपर्क कार्यालयातून विरोधकांवर टीकेची तोफ! शाश्वत विकासाच्या मुद्द्यावर भर
‘फेक’ पत्रकांविरोधात तक्रारीचा इशारा
रत्नागिरी: ना. उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत युतीच्या नेत्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. भाजपचे नेते बिपीन बंदरकर आणि दिपक पटवर्धन यांनी यावेळी संवाद साधताना शहरातील शाश्वत विकास आणि युतीच्या उमेदवारांच्या प्रभावी प्रचारावर भर दिला. यावेळी सचिन वहाळकर यांचीही उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत बोलताना बिपीन बंदरकर यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. त्यांनी स्पष्ट केले की, ना. सामंत यांच्या माध्यमातून शहरात शाश्वत विकास साधण्यावर युतीचा भर आहे. रत्नागिरीतील खराब रस्ते आणि सहा महिने असणारा पाऊस याव्यतिरिक्त विरोधकांकडे बोलण्यासाठी कोणतेही ठोस मुद्दे शिल्लक नाहीत.
“प्रभाग ४ मध्ये चुकीची पत्रके वाटली गेली आहेत. याविरोधात आम्ही शहर पोलीस स्थानकात तक्रार करणार आहोत,” असे सांगत त्यांनी विरोधकांच्या प्रचारतंत्रावर गंभीर आक्षेप घेतला. नुकत्याच झालेल्या राजेश सावंत यांच्या पत्रकार परिषदेत नगर पालिकेविरोधात केलेले आरोपही त्यांनी खोडून काढले.
बंदरकर यांनी युतीच्या उमेदवारांचा प्रचार आघाडीवर असल्याचे सांगितले. “विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, शाश्वत विकास शहरात होणार आहे,” असे महत्त्वपूर्ण आश्वासन त्यांनी दिले. तसेच, विरोधी गटातील ‘आघाडीत बिघाडी’ झाली असून, ‘उबाठा’ गट एकाकी पडला आहे, असा दावाही त्यांनी केला. युतीचे उमेदवार प्रचारात पूर्णपणे सक्रिय आहेत, असे त्यांनी नमूद केले.