स्वरा साखळकरला राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रौप्य पदक
रत्नागिरी: तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने जालंधर (पंजाब) येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या खेळाडूने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. रत्नागिरीची खेळाडू स्वरा विकास साखळकर हिने ३७ किलोखालील वजनी गटात रौप्य पदक संपादन करून महाराष्ट्राचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
पंजाब तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने दिनांक २१ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान जालंधर येथे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वरा साखळकर हिने या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आणि आपल्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
स्वरा ही एसआरके तायक्वांदो क्लब, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच शाहरुख शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या या महत्त्वपूर्ण यशाबद्दल सर्व रत्नागिरीकरांकडून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे यांच्यासह कार्यकारिणीने तिचे कौतुक केले. असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, तसेच क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना आणि मिलिंद भागवत यांनीही तिला शुभेच्छा दिल्या. एसआरके क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर यांच्यासह क्लबचे सदस्य आणि समस्त पालक वर्गाने स्वराचे अभिनंदन करत तिला प्रोत्साहन दिले आहे.
स्वराच्या या यशाबद्दल तायक्वांदो क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वरा साखळकरच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कामगिरीमुळे जिल्ह्यातील इतर युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे.