रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर
काँग्रेसचे नेते रमेश कीर, राष्ट्रवादी नेते मिलिंद कीर यांची घोषणा
रत्नागिरी
सुरुवातीपासून आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची असा तिन्ही पक्षांनी एकत्रित निर्णय घेतला होता मात्र बाळ माने बोलतात एक आणि करतात वेगळेच. त्यांच्यावर आता भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी हा शब्द यापुढे राहणार नाही असे सांगत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार हे दोघेही महाआघाडीतून बाहेर पडल्याची घोषणा कॉंग्रेसचे सरचिटणीस रमेश कीर आणि राष्ट्रवादीचे नेते मिलिंद किर यांनी पत्रकार परिषदेत केली.
रत्नागिरीत महाविकास आघाडीला आता घरघर लागली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) यांनी बाळ माने यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मिलिंद कीर यांच्यासह कॉंग्रेसचे उमेदवार उपस्थित होते.
सगळं ठरलं होतं
निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस असं तिघांनी मिळून रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक लढवावी असा आम्ही निश्चित केलं. शिवसेनेतर्फे पहिल्यापासून बाळ माने हे आमच्या संपर्कात होते आणि आम्ही सर्वांनी एकत्रित बसून ही चर्चा केली आणि अत्यंत सामंजस्याने वेळेप्रसंगी एक नव्हे तर दोन दोन पाऊल मागे घेऊन सीट वाटप खूप चांगल्या पद्धतीने आम्ही केलं.
आमच्या वाट्याला कमी सीटस
यावेळी बोलताना रमेश कीर पुढे म्हणाले की महाविकास आघाडीत आमच्या दोघांच्याही वाट्याला सीट्स अतिशय कमी प्रमाणात आल्या पण तेही आम्ही सामंजस्याने स्वीकारलं याचं कारण असं होतं की आम्हाला कुणासमोर लढायचा आहे. याचा निर्णय आम्ही केला होता. लोकांचा कल काय आहे याचा विचार करून आम्ही त्याला मान्यता दिली आणि त्याप्रमाणे प्रोसेस सुरू झाली.
आमच्यासमोर उमेदवार दिले
चर्चेनुसार जागा वाटप झाले. आही दोन पावले मागे आलो. मात्र त्यांच्या वाट्याला ज्या सीट्स आल्या होत्या त्या त्यांनी भराव्यात आमच्या ज्या काही सीट्स आहेत ते आम्ही भराव्यात त्याप्रमाणे आम्ही १७ तारखेला सगळ्यांनी आपल्या उमेदवारांचे एबी फॉर्म वगैरे सबमिट केले. त्याचदिवशी एक धक्कादायक गोष्ट अशी कळली की उबाठाचे बाळ माने यांनी आम्हाला दिलेल्या सीट्स समोर उबाठाचे उमेदवार उभे केले आहेत. त्यांना एबी फॉर्मदेखील दिले होते. आम्ही त्यादिवशी त्याबाबतची विचारणा केली. २१ तारखेला आपले उमेदवार अर्ज मागे घेतील असे बाळ माने यांनी सांगितले.
शब्द पाळला नाही
कीर पुढे म्हणाले की बाळ मानेंनी त्यावेळी सांगितले होते की २१ तारखेला आम्ही अर्ज मागे घेऊ काय काळजी करू नका, कार्यकर्ते नाराज होऊ नये म्हणून आम्ही असे अर्ज दाखल केले आहेत. शेवटी जेव्हा आघाडी असते तेव्हा एकमेकांवरचा विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो त्या दृष्टिकोनातून आम्ही यांच्या शब्दावर विश्वास ठेवला पण प्रत्यक्षात मात्र आम्हाला जो अनुभव आला तो अतिशय धक्कादायक आहे.
आघाडी शब्दाला अर्थ काय?
मी अतिशय मर्यादित शब्दात जे आम्हाला आज इथून जाहीर करायचे ते मी करणार आहे. मला कुणावरही फारशी टीका टिपणी करायची नाही आहे. माझी इच्छा नाहीये त्यांनी तिन्ही उमेदवार आमच्या समोरचे राष्ट्रवादी समोरचा एक आणि कॉंग्रेसच्या समोरचे दोन हे त्यांनी मागे घेतले नाहीत मग आघाडी या शब्दाला काय अर्थही राहत नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की रत्नागिरी नगर परिषदेत महाविकास आघाडी हा आमचा शब्द नसेल असे सांगत आघाडीतून बाहेर पडत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
त्यांनी उबाठा म्हणून लढावं
रत्नागिरी शहर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची शहर कॉंग्रेस आम्ही एकत्रितपणे लढू. आमचे उमेदवार घेऊन पण आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष नसून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांनी लढावं. आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही मात्र दोन कॉंग्रेस एकत्रितपणे ही निवडणूक लढू. आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तीनठिकाणी उमेदवार दिले
प्रभाग क्रमांक १६ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन उमेदवार आहेत तसेच प्रभाग क्र. १३ ब मध्ये कॉंग्रेसचा उमेदवार आहे. या उमेदवारांसमोरच मशाल चिन्हाचे उमेदवार बाळ मानेंनी उभे केले आहेत. बाळ माने हे खूप हुशार आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. असे सांगून यापुढे महाविकास आघाडी हा शब्द नगर परिषद निवडणुकीसाठी लागू होणार नाही असे रमेश कीर यांनी जाहीर केल.