रत्नागिरी जिल्ह्याला मिळणार १५० ई-बस
दापोली आगारात ‘शिवाई ई-बसेस’ दाखल
दापोली: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतिहासातील कोकण विभागातील पहिला पर्यावरणपूरक प्रकल्प दापोली येथे साकार झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महायुती सरकारने प्रदूषणमुक्त आणि अद्ययावत प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या धोरणांतर्गत, महामंडळाच्या पहिल्या इलेक्ट्रिक ‘शिवाई ई-बसेस’ दापोली आगारामध्ये दाखल झाल्या असून, आमदार योगेश कदम यांच्या हस्ते या बसेसचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. राज्यातील जुन्या, नादुरुस्त बसेस बदलून त्याजागी नवीन अत्याधुनिक बसेस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून, दापोली तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात १० अत्याधुनिक ‘शिवाई ई-बसेस’ प्रवासी सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. आगामी काळात दापोलीसाठी आणखी २६, तर शेजारच्या खेड तालुक्यासाठी ३५ अशा एकूण ७१ ई-बसेस मिळणार आहेत. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुमारे १५० ई-बसेस उपलब्ध होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आमदार कदम यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना आमदार कदम यांनी, “प्रदूषणविरहित ई-बसेस आणि पूर्णपणे विजेवर चालणाऱ्या या बसेसमुळे जनतेला अतिशय चांगली सुविधा मिळणार आहे. कोकण हे जैवविविधतेने संपन्न आहे. या प्रदेशाचा पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषणमुक्त कोकण टिकवण्यासाठी ‘शिवाई ई-बसेस’ अत्यंत मोलाची भूमिका बजावतील,” असा विश्वास व्यक्त केला.
या ‘शिवाई ई-बसेस’मध्ये प्रवाशांसाठी वातानुकूलित सुविधा, जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली आणि आपत्कालीन सूचना प्रणाली यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दिव्यांग प्रवाशांसाठी बसमध्ये वेगळा ‘रॅम्प’ असल्याने त्यांना बसमध्ये चढणे-उतरणे सोपे होणार आहे. महामंडळातर्फे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती या ई-बसेसनाही लागू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले.
पर्यटकांनी गजबजलेल्या दापोली तालुक्यासाठी या बसेस अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. दरवर्षी ५ हजार नवीन बसेस घेण्याचा सरकारने घेतलेला निर्णय उत्तम आणि स्वागतार्ह असल्याचे मत आमदार कदम यांनी व्यक्त केले. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.
या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी विभागाचे नियंत्रक श्री. प्रजेश बोरसे, दापोली आगार व्यवस्थापक श्री. राजेंद्र साबळे, दापोली नगराध्यक्षा सौ. कृपाताई घाग, तालुकाप्रमुख श्री. उन्मेष राजे, विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. किशोर देसाई, विभागाचे कर्मचारी, तसेच मोठ्या संख्येने प्रवासी आणि नागरिक उपस्थित होते. ‘शिवाई ई-बसेस’च्या या आगमनाने कोकणातील प्रवासी सेवा अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक होण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे.