पंढरपूर जाण्यासाठी १३५ गाड्यांचे आरक्षण
रत्नागिरी: आषाढी एकादशीच्या कालावधीत जिल्ह्यात खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू असल्यामुळे एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या कमी असते; मात्र, कार्तिकी एकादशीला जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणावर पंढरपूरला जातात. यावर्षी २ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीचा उत्सव आहे. त्यासाठी जिल्ह्यातून १५२ जादा गाड्या पंढरपूरला सोडण्याचे नियोजन एसटी विभागाने केले असून, आतापर्यंत १३५ गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले
वर्षातून दोनवेळा एकादशीच्या उत्सवासाठी पंढरपूर येथे भाविकांची गर्दी होते. आषाढी एकादशीची वारी मोठी असते; परंतु याच कालावधीत जिल्ह्यात शेतीची कामे सुरू असल्यामुळे भाविकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही; परंतु कार्तिकी एकादशीला मात्र भाविक बहुसंख्येने पंढरपूरला जातात. रत्नागिरी विभागातून त्यासाठी १५२ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. भाविकांनी थेट ग्रुप बुकिंग केल्यामुळे त्या त्या गावातून या सोडण्यात येणार आहेत. कार्तिकी एकादशीसाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागातून एसटी आरक्षण सुरू आहे. आतापर्यंत १३५ गाड्यांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. याला लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, देवरूख, खेड, दापोली या आगारातून जास्त आरक्षण झाले आहे. जास्तीत जास्त १५२ गाड्यांचे आरक्षण होईल, असा महामंडळाचा अंदाज आहे. २८ ते २९ ऑक्टोबरपासून गाड्या पंढरपूरकडे रवाना होणार आहेत तर ३ नोव्हेंबरपासून परतीचा प्रवास सुरू होणार आहे.