कोंडगावात मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकावर गुन्हा दाखल
देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील आझाद मैदान रोडलगत असलेल्या एका बांधाजवळ उघड्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगार अड्ड्यावर देवरुख पोलिसांनी धाड टाकून एका व्यक्तीला अटक केली आहे. दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्याचे महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल मनस्वी मंदार पावसकर यांनी फिर्याद दिली आहे. महेंद्र गोपाळ सकपाळ (वय ५७ वर्षे, रा. साखरपा, सकपाळवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र सकपाळ हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी न घेता ‘कल्याण’ नावाच्या मटका जुगारावर लोकांकडून पैसे लावून जुगार खेळ खेळवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे देवरुख पोलिसांनी कोंडगाव येथील आझाद मैदान रोडलगतच्या ठिकाणी सापळा रचला आणि जुगार खेळ सुरू असताना आरोपीला रंगेहाथ पकडले.
पोलिसांनी घटनास्थळावरून जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि जुगाराचे रोख १,१२०/- रुपये हस्तगत केले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे १,१२५/- रुपये आहे.
याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा (गु.र.क्र. १२०/२०२५) दाखल करण्यात आला आहे. देवरुख पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.