सैतवडे परिसरातील गुंबद तंटामुक्त अध्यक्षपदी दिलावर खान यांची एकमताने निवड
रत्नागिरी: सैतवडे परिसरातील गुंबद ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गावातील ज्येष्ठ आणि क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते दिलावर कासम खान यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
गुंबद ग्रामपंचायतीची महत्त्वपूर्ण ग्रामसभा नुकतीच पार पडली. या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी विचारमंथन झाले. यावेळी दिलावर खान यांच्या नावावर सर्वांनी एकमताने शिक्कामोर्तब करत त्यांची अध्यक्षपदी निवड केली.
दिलावर खान हे गावाच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यांमध्ये नेहमीच आघाडीवर राहिलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, निगर्वी वृत्ती आणि निस्वार्थ सेवाभावी कार्य यामुळे ते केवळ गुंबद नव्हे, तर परिसरातील सर्वांना परिचित आहेत. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊनच ग्रामस्थांनी त्यांच्यावर हा महत्त्वाचा विश्वास टाकल्याचे बोलले जात आहे.
या निवडीबद्दल गुंबद ग्रामपंचायतीच्या वतीने आज त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच उषा सावंत, उपसरपंच मुनाफ वागले, ग्रामसेवक, तसेच ग्रामपंचायत सदस्य बानू खलफे, अजीज माद्रे, अनिल जाधव, अजीज मुल्ला, अल्ताफ खतीब यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलावर खान यांच्या अध्यक्षतेखाली ही तंटामुक्त समिती गावातील वाद, कलह सामोपचाराने सोडवून गुंबद गावाला अधिक शांततापूर्ण आणि विकासाच्या मार्गावर नेईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.