चिपळूण पालिकेचा अनधिकृत फलकांवर कारवाईचा बडगा
चिपळूण: चिपळूण पालिकेने शहरातील शुभेच्छांचे जाहिरात फलक हटवण्यास सुरवात केली आहे. पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत हे काम चालू राहणार आहे. त्यासाठी अतिक्रमण विभागप्रमुख संदेश टोपरे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. शहरात लागलेले ३२ अनधिकृत फलक आतापर्यंत काढले आहेत. त्यात बहुतांश जाहिरात फलकांमध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते व पुढाऱ्यांच्या फलकांचा समावेश आहे.
चिपळूण पालिका निवडणुकीची कार्यवाही पालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील जाहिरातींचे फलक हटवण्याचे काम सुरू झाले आहे. शहरात विविध धार्मिक सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शुभेच्छांचे फलक लावले होते, तर काहींनी वाढदिवस, विविध प्रकारची शिबिरे आणि इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्धी मिळवण्यासाठी शुभेच्छा फलक लावले होते. यातील केवळ चार फलकांसाठी पालिकेने परवानगी दिली होती. परवानगी संपल्यानंतर संबंधितांनी ते फलक स्वखर्चाने काढावे नाहीतर पालिका कारवाई करेल, असा इशारा त्यांना देण्यात आला होता; मात्र मुदत संपल्यानंतरही हे फलक हटवले नाहीत. त्यामुळे पालिकेने मुदत संपलेले फलकही हटवले आहेत.
चौकट
निवडणुकांची चाहूल
बहादूरशेख नाक्यापासून पाग पॉवरहाऊसपर्यंत उड्डाणपुलाच्या पिलरवर अनेकांचे जाहिरात फलक झळक आहेत. तेही पालिका काढणार आहे. सध्या शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावलेले फलक काढण्यात आले. खेडेकर क्रीडासंकुल, सांस्कृतिक केंद्र, भाजीमंडईच्या परिसरातील बॅनरही काढले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची लवकरच रणधुमाळी सुरू होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. आता प्रभागातील आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर किंवा डिसेंबरअखेर कधीही जाहीर होऊ शकतात.