कनकाडीत भीषण आग; गोठा जळून खाक
५ लाखांचे नुकसान
संगमेश्वर: तालुक्यातील कनकाडी खालची गुरववाडी येथील लक्ष्मीकांत शंकर गाताडे यांच्या घरासमोर असणाऱ्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना काल गुरूवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या भीषण आगीत संपूर्ण गोठा आगीच्या भक्षस्थानी पडला आहे. यामध्ये कृषी साहित्य आणि इतर अवजारे जळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कनकाडी खालची गुरवावाडी येथील ग्रामस्थ लक्ष्मीकांत शंकर गाताडे हे राहतात. त्यांचा शेती आणि वेल्डिंग हा व्यवसाय आहे. त्यांच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात जनावरे नसल्यामुळे त्यात त्यांनी शेतीची अवजारे ठेवली होती. या गोठ्याला गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत आतील सर्व सामान तसेच एक नवीन दुचाकी आणि गाताडे यांचा मोबाईल जळून खाक झाला.
आगीमध्ये नव्याने घेतलेली १२५ CC शाईन ही दुचाकी, ७.५ एचपीचा पॉवरटिलर, २ ग्रास कटर, एअर कॉमप्रेसर, वेल्डिंग मशीन, पाण्याच्या ५०० लिटरच्या ३ टाक्या, HDP पाईपची ३ बंडले, कृषी फवारणी पंप, हॉलोजन लाईट व त्याचे वायरिंग, ग्रिन नेट, पाण्याचे २ ड्रम, वैयक्तिक मोबाईल हे सर्व साहित्य जाळून पूर्णत: नष्ट झाले आहे. तसेच पक्क्या बांधणीचा गोठाही जळून खाक झाला. गाताडे यांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने आणि शेतीची सर्व अवजारे आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे त्यांच्या कुटुंबासमोर चरितार्थाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या आगीचे वृत्त समजल्यावर सरपंच संतोष गोताड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. तसेच तलाठी कर्मचारी तृप्ती डोंगरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी करून पंचनामा केला.