गुहागरमध्ये तरुणाची गळफास घेत आत्महत्या
गुहागर : तालुक्यातील चिखली येथील ओम्कार मंगल कार्यालयात एका ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वप्नील गोपाळ कानसे (वय ३५, रा. चिखली मांडवकरवाडी, ता. गुहागर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास घडली. चिखली येथील ओमकार मंगल कार्यालयाच्या किचनमध्ये स्वप्नील कानसे यांनी पंख्यासाठी असलेल्या हुकला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही बाब समोर आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. स्वप्नील कानसे यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.