रत्नागिरी ः तालुक्यातील निवळी-बावनदी उतारात कंटेनर निष्काळजी चालवून स्वतःच्या मरणास व वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत झालेल्या कंटेनर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष जगतपाल वर्मा (वय २३, रा. बंन्डा, खुटार, छातरपुर, प्रतापगड, उत्तरप्रदेश) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास निवळी-बावनदी सुतारवाडी, येथील उतारातील वळणावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास कंटेनर (क्र. एमएच-४६ बीबी १५३७) वरिल चालक मृत सुभाष वर्मा याने कंटेनर निष्काळजीपणे चालविल्यामुळे उलटला या अपघातात त्याचा मृत्यू झाला. तसेच वाहनाचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस पाटील सौ. संजना संजय पवार (वय ४१, रा. निवळी कोकजे वठार, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी संशयित कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.