चांदेराई मारहाण प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील चांदेराई-तेलीवाडी रस्त्यात रिक्षा आडवी करुन ठेवल्याने रिक्षा काढण्यासाठी हॉर्न वाजविल्याच्या रागातून व पुर्ववैमन्स्यातून मारहाण व दुखापत केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समिर सुरेश आंब्रे (वय ४५), अमित सुरेश आंब्रे (वय ४२) व एक महिला (सर्व रा. तेलीवाडी-चांदेराई, रत्नागिरी) अशी मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. ६) सकाळी आठच्या सुमारास चांदेराई-तेलीवाडी रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विनोद प्रमोद आंब्रे (वय ५०, रा. तेलीवाडी-चांदेराई, रत्नागिरी) हे चांदेराई बाजारात गेले होते. बाजारहाट संपवून घरी जात असताना वाडीत जाणाऱ्या रस्त्यामध्ये संशयित समिर आंब्रे यांची रिक्षा रस्त्यात आडवी होती म्हणून त्यांनी हॉर्न वाजविला. आवाज ऐकून फिर्यादी यांची आई हिने अंगणात येवून काय झाले या बाबत विचारणा केली असता संशयित समिर यांनी पुर्वी जमिनीच्या वाद लक्षात घेऊन शिवीगाळ व मारहाण केली. फिर्यादी हे सोडवायला गेले संशयित अमित आंब्रे याने हातातील लाकडी दांडा फिर्यादी विनोद आंब्रे यांच्या चेहऱ्यावर मारला तो त्यांच्या डोळ्याला नाकाला लागला. फिर्यादी खाली पडले. या मारहाणीत फिर्यादी यांची पत्नी व मुलगी यांना देखील संशयितांना मारहाण करुन शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विनोद आब्रे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तिन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.