शिरगाव ग्रामपंचायत अधिकारी उल्हास कोळींचे कर्तव्यदक्ष काम; नागरिकांकडून कौतुक
रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या शिरगाव ग्रामपंचायतीमधील उद्ययमनगर, पटवर्धनवाडी येथील अजीजा हाईट्स परिसरात गटार तुंबणे आणि अस्वच्छतेची समस्या भेडसावत होती. पावसाळ्याच्या दिवसांत गटाराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता, तसेच रस्त्याच्या कडेला साफसफाईचा अभाव होता.या भागातील नागरिकांनी आठ दिवसांपूर्वीच शिरगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी उल्हास कोळी आणि स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांकडे या समस्येबाबत माहिती दिली होती. मात्र, यावर कोणतीही तातडीची कारवाई झाली नव्हती. अखेर, आज पुन्हा नागरिकांनी उल्हास कोळी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.नागरिकांची समस्या ऐकून कोळी यांनी तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतः उपस्थित राहून या भागातील साफसफाई करून घेतली. तसेच, गटाराच्या समस्येवरही येत्या काही दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांपैकी कोणीही उपस्थित नव्हते, तरीही उल्हास कोळी यांनी दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठेमुळे आणि तत्परतेमुळे अजीजा हाईट्स परिसरातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या या कामामुळे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा अधिक उंचावली आहे.