उद्योग मंत्री उदय सामंतानी एमआयडीसी विरोधकांचे पुरावे जाहिर करून टाकावेत: संघर्ष समितीप्रमुख प्रथमेश गवाणकरांचे थेट आव्हान
लढा वाटद एमआयडीसीचा
रत्नागिरी :
वाटद एमआयडीसीला विरोध करणाऱ्यांचे जे काही पुरावे पालकमंत्री उदय सामंत आणि प्रशासनाकडे आहेत ते त्यांनी जाहिर करून टाकावेत म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल असे थेट आव्हान वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष समिती प्रमुख प्रथमेश गवाणकर यांनी आज पालकमंत्री उदय सामंत यांना दिले आहे.काल शनिवारी खंडाळा येथे एमआयडीसी समर्थनासाठी झालेल्या सभेत पालकमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीला विरोध करणाऱ्यांवर आरोप केले होते त्याला प्रथमेश गवाणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
प्रथमेश गवाणकर यांनी सांगितले की,हा लढा पालकमंत्र्याविरूध्द नाही.हा लढा प्रशासन राबवित असलेले धोरण आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या सभोवती राहून सर्वसामान्य जनतेच्या जमिनी कवडीमोल दराने विकणाऱ्या दलालांविरूध्द आहे.त्यातील काही जण एमआयडीसी बाधित शेतकऱ्यांची खोटी खरेदीखते बनवून जेलवारी करून आल्याचा आरोप गवाणकर यांनी केला.कालच्या समर्थन सभेला विविध आमिषे दाखवूनही लोकं घराबाहेर पडली नाहीत.म्हणून वरवडे,जयगड,सैतवडे आणि जांभारी गावातून माणसं आणावी लागल्याचा आरोप प्रथमेश गवाणकर यांनी केला आहे.पत्रकारांनी त्या सहा गावात गडनरळ,कोळीसरे,वाटद,वैद्यलावगण,मिरवणे आणि कळझोंडी गावात घराघरात जाऊन सर्व्हे करावा म्हणजे कळेल विरोध किती आहे तो असा सल्ला गवाणकर यांनी दिला.