रत्नागिरीत कर्करोग जनजागृती मोहीमे अंतर्गत ७९७ रुग्णांची तपासणी
७ संशयितांची बायोप्सी
रत्नागिरी
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष रत्नागिरी आणि उदय सामंत प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे १९ जून २०२५ रोजी मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाच्या तपासणी व जनजागृतीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजित या शिबिरास नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
माजी नगरसेविका स्मितल पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख बिपीन बंदरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सचिन साळुंखे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. यश प्रसादे, दंतवैद्य डॉ. शुभदा बडवे, वालावलकर रुग्णालय डेरवणचे डॉ. धनंजय दुमणवार, डॉ. रसिका शिरसाट, डॉ. रसिका आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी आरोग्य शिबिरात कर्करोगाविषयी जनतेमध्ये, विशेषतः महिला वर्गात, जनजागरण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे माहिती दिली की, जिल्हा नियोजन समितीमार्फत पालकमंत्री डॉ. उदयजी सामंत साहेब यांच्या पुढाकाराने जिल्ह्यामध्ये स्तन व गर्भाशयमुख तपासणीसाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध झाली आहेत आणि त्यातील AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर रुग्ण तपासणीसाठी होत आहे.
शिबिराच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद, कोतवडे, ग्रामीण रुग्णालय पाली आणि ग्रामपंचायत चिंद्रवली या ठिकाणीही कॅन्सर व्हॅनद्वारे तपासणी करण्यात आली. या एकूण तपासणीमध्ये ७९७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ०२ मुख कर्करोग, ०२ स्तन कर्करोग आणि ०३ गर्भाशय मुख कर्करोग असे एकूण ०७ संशयित रुग्णांची बायोप्सी करण्यात आली. तसेच ५३ संशयित महिलांचे Pap Smear घेऊन पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.