
रत्नागिरी वाटद येथे डिफेन्स सिटी; नाविक तळ नाही
मिलिंद किर; संरक्षण मंत्रालयाला पत्र
रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद औद्योगिक क्षेत्रात सुमारे 10,000 हजार कोटींच्या गुंतवणुकीसह धिरुभाई अंबानी डिफेन्स सिटी प्रकल्प प्रस्तावित आहे. रिलायन्स ग्रुप आणि जर्मन कंपनी यांच्यातील भागीदारीतून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या भव्य प्रकल्पात दरवष 200,000 आर्टिलरी शेल्स 10,000 टन स्फोटके 2,000 टन प्रोपेलंट्स तोफांचे दारुगोळे, लष्करी सामुग्री व यंत्रणा तयार केली जाणार आहे. पण याच्या सुरक्षेसाठी रत्नागिरीत नौदल तळ नाही. याबाबतचे पत्र माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांनी संरक्षण मंत्रालयाला दिले आहे.
रत्नागिरी कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाचे शहर असून, ही जागा भौगोलिकदृष्ट्या खुल्या आक्रमणाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. येथे सध्या एक कोस्ट गार्ड स्टेशन आहे. मात्र ते फक्त शोध, बचाव व निरीक्षण कार्यापुरते मर्यादित आहे. युद्धजन्य परिस्थितीत तात्काळ कारवाई करणारा नौदल तळ अजून अस्तित्वात नाही.
सन 2020 मध्ये लेबनॉन बेरूत बंदरावर 2,750 टन अमोनियम नायट्रेट साठवले गेले होते. त्याचा स्फोट होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले, हजारो जखमी झाले आणि पूर्ण शहर हादरले. यावरून स्पष्ट होते की स्फोटक व्यवसायातून संभाव्य विनाश किती भयावह असू शकतो. स्थानिक सत्ताधाऱ्यांनी अशा दुर्घटनांपासून शिकणं गरजेचं आहे.
जर प्रकल्प रत्नागिरीतच राहणार असेल, तर नौदल तळ तातडीने उभारावा. हा प्रकल्प आर्थिक नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आहे. म्हणून शासनाने फार काळजीपूर्वक निर्णय घ्यावे, अशी मागणीही मिलींद कीर यांनी केली आहे.