
उद्योगमंत्री उदय सामंत यांची वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट; उत्पादनांची केली प्रशंसा
चिपळूण: महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पिंपळी (ता. चिपळूण) येथील वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट देत उत्पादन प्रक्रियेची पाहणी केली. डेअरीत तयार होणाऱ्या ६५ विविध दुग्धजन्य उत्पादनांचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि “वाशिष्ठी डेअरीची उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही दिली.
यापूर्वी दोन दिवसांपूर्वी उदय सामंत यांचे बंधू, राजापूरचे आमदार किरण सामंत यांनीही या डेअरी प्रकल्पाला भेट दिली होती. त्यानंतर आज शुक्रवारी खुद्द ना. उदय सामंत यांनी उपस्थित राहून डेअरीतील कार्यपद्धती, उत्पादने आणि वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला.
प्रकल्प प्रमुख व वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी ना. सामंत यांना संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. दूध कोणकोणत्या गावांतून संकलित होते, त्याचे प्रमाण, प्रक्रिया केंद्रातील यंत्रणा, डेअरीतून तयार होणारे विविध पदार्थ — जसे की दूध, ताक, श्रीखंड, दही, चीज इत्यादी — यांची माहिती त्यांनी उलगडून सांगितली. तसेच विक्रीसाठी जिल्ह्यात व राज्यात उभारलेले स्टॉल्स, वितरण व्यवस्था, तसेच आगामी विस्तार योजना यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
या प्रसंगी वाशिष्ठी डेअरीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. उदय सामंत यांनी प्रकल्पाचा आढावा घेतल्यानंतर डेअरीच्या कार्यक्षमतेचे आणि गुणवत्तेचे विशेष कौतुक केले. त्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत समाधान व्यक्त केले.
या वेळी विनोद झगडे, रमण डांगे, शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ आदी उपस्थित होते.
या भेटीद्वारे वाशिष्ठी डेअरीच्या प्रकल्पास राज्यस्तरावर अधिक व्यापक दृष्टीने चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.