
संगमेश्वर साखरपा येथे घरफोडी : दीड लाखांचे दागिने लांबवले
संगमेश्वर : तालुक्यातील साखरपा-सुर्वेवाडी येथे एका धक्कादायक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेच्या घरातूनच १ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिन्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साखरपा-सुर्वेवाडी येथील रहिवासी असलेल्या ६६ वर्षीय सरिता सुरेश सुर्वे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या राहत्या घरातील माळ्यावर ठेवलेल्या एका पत्र्याच्या पेटीमध्ये १ लाख १० हजार रुपये किमतीचे, सुमारे ६८ ग्रॅम ७९८ मिली वजनाचे सोन्याचे दागिने ठेवले होते. १० जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते दिनांक १० जून २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत हा चोरीचा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या गुन्ह्यात, फिर्यादीच्या घरातच राहत असलेल्या दोन महिला आरोपींपैकी एका महिलेने चोरी केल्याचा संशय आहे. देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.