पावस बाजारपेठेत घरांमध्ये पाणी शिरले; नागरिक भयभीत, रात्रीची वेळ अधिकच भयानक
रत्नागिरी
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दैनंदिन जीवन विस्कळीत केले आहे. पावस तालुक्यातील पावस बाजारपेठेत पाणी साचून घरांमध्ये पाणी शिरल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
रात्रीच्या वेळेस ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिक जीव मुठीत घेऊन घरातच थांबलेले आहेत. बाजारपेठेतील मुख्य भागासह आजूबाजूच्या गल्लीबोळांत पाणी घुसल्याने लोकांची अवस्था अत्यंत हालाकीची झाली आहे.
संतोष सुर्वे यांच्या घरातही पाणी घुसले असून घरात पाण्याचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. अनेक घरांमध्ये जमिनीवरील सामान, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर पाणी चढल्याने नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाने दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जाहीर केला असून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळपासून पावस बाजारपेठ आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळू लागला.
बाजारपेठेच्या चौफेर पाण्याने वेढलेल्या परिस्थितीमुळे, नागरिक घराबाहेर पडण्याची हिंमत करत नसून, रात्रभर घरात थांबून तग धरत आहेत. विजेचा पुरवठाही काही भागांत खंडित झाला आहे.
स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व ग्रामपंचायत यांनी तातडीने मदतीसाठी यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची तयारी प्रशासनाने ठेवावी, अशी अपेक्षा आहे.
पावसाच्या मुसळधार सरी कोकणात पुढील २४-४८ तास सुरू राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.