मिऱ्या-नागपूर मार्गावर खानू येथे कार, टेम्पो ओढ्यात अडकले, गर्डरही गेले वाहून
रत्नागिरी: मिऱ्या – नागपूर महामार्गावर खानू-कशेळी गावच्या हद्दीतील ओढ्यावर चौपदरीकरणामुळे नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ओढ्याच्या प्रवाहात एक छोटा सिमेंट पाईप पाण्याचा निचरा होण्यासाठी टाकण्यात आला होता. रात्रीच्या मुसळधार पावसात यामुळे पाण्याला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आणि रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पाणी थेट पाच ते सहा फूट उंचीवर महामार्गावर आले. याहून गंभीर बाब म्हणजे, कंत्राटदार कंपनीने येथे कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना केलेली नव्हती. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या एका स्विफ्ट कारचालकाला मुसळधार पावसात आणि रात्रीच्या वेळी चिखलमिश्रित पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही. परिणामी, कार ओढ्यात पडली आणि एक टेम्पोही ओढ्यात जाऊन अडकला. सुदैवाने, त्याच वेळी महामार्गावरून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांनी प्रसंगावधान राखून कारचालकासह इतरांना गाडीतून बाहेर काढले आणि मोठी दुर्घटना टळली.

या घटनेनंतर पाण्याचा प्रवाह आणखी वाढल्याने महामार्ग पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. केवळ नशीब बलवत्तर असल्यानेच कार आणि टेम्पोमधील चालक बचावले, अन्यथा रात्रीच्या अंधारात पाण्याच्या प्रवाहाबरोबर कार वाहून जाऊन मोठा अनर्थ घडला असता. रात्री पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, महामार्गाच्या कामासाठी ठेवलेले सिमेंटचे वीस फुटी गर्डर देखील ओढ्यात कोसळले. महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाल्यामुळे मोठी कोंडी झाली होती.