कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंडच्या निर्णयाशी माझा सुताराम संबंध नाही – माजी आमदार राजन साळवी
लांजा : कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड प्रकल्पात मी पैसे घेतले हे विधान दुर्दैवी आहे. मुळातच डम्पिंग ग्राउंड हा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक व यांनी घेतलेला निर्णय आहे. या प्रकरणाशी माझा सुतारामही संबंध नाही असा खुलासा माजी आमदार राजन साळवी यांनी केला आहे.
कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड प्रकरणात माजी आमदार राजन साळवी यांनी ५० लाख रुपयांची लाच घेतल्याचा खळबळजनक आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन साळवी यांनी आज बुधवारी ७ मे रोजी लांजा येथे पत्रकार परिषद घेऊन या आरोपाचे खंडन केले आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना राजन साळवी यांनी सांगितले की, कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड प्रकल्प होण्यासाठी मी ५० लाख रुपयांची लाच घेतली असा जो आरोप केला गेला आहे ते विधान पूर्णपणे दुर्दैवी आहे. कारण मुळातच हा डंपिंग ग्राऊंड प्रकल्प व्हावा ही शासनाची भूमिका आहे. त्यानंतर तो मंजूर करण्यात आला. यामध्ये नगर पंचायत प्रशासन, त्यावेळचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी तो निर्णय घेतलेला होता. त्यावेळी मी हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार म्हणून कार्यरत होतो. त्यामुळे
या डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाशी माझा सुताराम संबंध नाही. तरीही दुर्दैवाने या विषयात माझे नाव जोडले गेले. हा प्रकल्प झाला नाही तर नगरपंचायतीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला जाईल असे संबंधित
प्रशासनाकडून नगरपंचायतीला पत्र देण्यात आले होते. त्यानंतर प्रशासन आणि नगरपंचायत बॉडी यांनी तो निर्णय घेतलेला होता. त्यामुळे कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड प्रकरणाशी माझा अंशतः संबंध नाही.
ते पुढे म्हणाले की, कोत्रेवाडीतील डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाला तेथील स्थानिक लोकांचा विरोध आहे. कारण तो लोकवस्तीपासून जवळ असून लोकांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. वाडी उध्वस्त होणार असल्याने मी स्वतः कोत्रेवाडीतील लोकांची भेट घेतली होती आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. मी आज, उद्या आणि कायमच तेथील लोकांसोबत राहणार आहे, असे माजी आमदार राजन साळवी यांनी सांगितले.
दरम्यान माजी आमदार राजन साळवी यांनी आपल्यावर पैसे घेतल्याच्या आरोपाचे खंडन करतानाच कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड प्रकल्प होण्यामागे सर्वस्वी नगराध्यक्ष आणि नगरसेवक हेच जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले आहे.