
चिपळूणमध्ये रस्त्यावर धोकादायक पार्किंग; चार जणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी, : चिपळूण शहरात सार्वजनिक रस्त्यांवर वाहने बेकायदेशीरपणे उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. एकाच दिवसात अशा चार जणांवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शहरातील पुजा थिएटरसमोरील रस्त्यावर (गु.र.नं. १०४/२०२५) इरफान उमर इनामदार (वय ५५) यांनी त्यांची पिवळ्या रंगाची मॅजिक गाडी (क्रमांक एम.एच.०८/झेड ६६०९) रस्त्याच्या मधोमध उभी केली आणि ते निघून गेले. यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास झाला.
दुसरी घटना अलोरे शिरगाव येथे घडली. येथे ८ मे रोजी दुपारी १२.१५ वाजता शिरगाव बाजारपेठेत (गु.र.नं. ३५/२०२५) उमेश अनंत शिंदे (वय ४७) यांनी त्यांची टाटा मॅजिक गाडी (क्रमांक एम.एच.०८-आर-७४०४) रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यांच्या या कृत्यामुळे पादचाऱ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता.
त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोफळी नाका बाजारपेठेत (गु.र.नं. ३६/२०२५) संकेत अनंत सोलकर (वय ३४) यांनी त्यांची टाटा मॅजिक गाडी (क्रमांक एम.एच.०८-एएन-०६६५) रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभी करून लोकांना त्रास दिला.
याचबरोबर, ८ मे रोजी दुपारी १२ वाजता पुजा थिएटरसमोरील आणखी एका घटनेत (गु.र.नं. १०३/२०२५) नितीन शंकर सावंत (वय ४९) यांनी त्यांची पांढऱ्या रंगाची मॅजिक गाडी (क्रमांक एम.एच.०८/झेड /७१३६) रस्त्यावर उभी करून वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांसाठी धोका निर्माण केला.
या चारही घटनांमध्ये अशोक महादेव पवार आणि निखिल युवराज जगदाळे यांनी फिर्याद दाखल केली असून, चिपळूण पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदारपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.